अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून (Russia) तेल खरेदी करणे बंद केले असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे. भारतीय सरकारी रिफायनरी कंपन्या गेल्या अनेक दिवसांपासून रशियाकडून तेल खरेदी करत होत्या मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारताने माघार घेतली असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून भारतीय कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून भारताला तेल खरेदीवर इशारा देत असल्याने कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केले असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. भारत हा समुद्री मार्गाने रशियाकडून तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असून देशातील चार सरकारी कंपन्या रशियाकडून तेल खरेदी करत होत्या. ज्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि मंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड यांचा समावेश आहे.
रॉयटर्सने रशियाकडून तेल खरेदी न करण्याबाबत या कंपन्यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा देखील रॉयटर्सने केला आहे. तर दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यानंतर आता भारतीय कंपन्या अबू धाबी आणि पश्चिम आफ्रिकन देशांकडून तेल खरेदी करत असल्याचा दावा देखील रॉयटर्सकडून करण्यात आला आहे.