मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Bomb Blast Case) 29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात आज 17 वर्षं पूर्ण होत आहेत. सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू या स्फोटात झाला होता, तर गंभीर जखमी 100 पेक्षा अधिक लोक झाले होते. भीकू चौकाजवळ एका दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. अनेक कुटुंबं अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. आता तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आज (31 जुलै) मुंबईतील (Mumbai) एनआयएच्या विशेष न्यायालयात (NIA Court) होणार आहे.
Malegaon Bomb Blast Case मालेगावात काय घडलं होतं?
मालेगावमध्ये 2008 साली मशिदीजवळ उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये बॉम्ब स्फोट झाला. रमजान महिन्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी होती. सहा नागरिकांचा या स्फोटात मृत्यू झाला, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी (Malegaon Bomb Blast Case) झाले.महाराष्ट्र एटीएसने सुरुवातीला तपास सुरू केला आणि नंतर 2011 मध्ये तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यात रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, प्रविण तकलकी, शामजी साहू आणि राकेश धावडे यांचा समावेश आहे.
Malegaon Bomb Blast Case तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया
सुरुवातीच्या तपासात एटीएसने आरोप केला होता की, स्फोटकांनी भरलेली जी दुचाकी सापडली. ती साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. स्फोटासाठी RDX वापरण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालं. एटीएसने दावा केला की, आरोपींनी 2008 च्या सुरुवातीला फरीदाबाद, भोपाळ, नाशिक येथे बैठका घेऊन स्फोटाचा कट रचला. RDX जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टिंग दरम्यान मिळवण्यात आलं, आणि नंतर ते सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब तयार करण्यात वापरलं गेलं. या स्फोटाचा उद्देश मुस्लिम समाजात भीती निर्माण करून तणाव पसरवण्याचा आहे, असा दावा एनआयएनं न्यायालयात केला आहे.
Malegaon Bomb Blast Case न्यायालयीन घडामोडी
2018 मध्ये या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयानं 323 साक्षीदार तपासले, मात्र त्यातील 37 साक्षीदारांनी आपली जबाबे बदलली. एटीएसने मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, पण तो नंतर मागे घेण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्याला राजकीय हेतूनं गोवलं गेलं असल्याचा दावा केला आहे. कर्नल पुरोहित यांनीही आपल्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण न्यायालयानं ती फेटाळली आणि त्यांच्याविरोधात आरोप चालू ठेवले.
Malegaon Bomb Blast Case आरोप काय?
सात आरोपींवर युएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी कृत्य करणे, त्याचा कट रचना, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि धार्मिक तेढ वाढवण्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे एनआयएने या सर्व आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली आहे. याप्रकरणी आज (31 जुलै) विशेष NIA न्यायालय आपला निकाल देणार आहे. तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणात न्याय मिळणार की अजून प्रतीक्षा वाढणार, हे काही तासांत स्पष्ट होईल.