इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर उद्यापासून (गुरुवार) सुरू होणार आहे. मात्र, या निर्णायक लढतीआधीच टीम इंडियाला जबरदस्त धक्का बसला आहे. आधीच यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असताना, आता भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील पाचव्या कसोटीत खेळणार नाही.
बुमराह विश्रांतीवर वैद्यकीय टीमचा निर्णय महत्त्वाचा
बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने बुमराहला पाठीच्या त्रासामुळे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्याच्या भविष्यातील कामगिरीवर परिणाम होणार नाही. खरंतर इंग्लंड दौऱ्याआधीच ठरवण्यात आलं होतं की बुमराह फक्त तीनच कसोटीत खेळेल. त्यानुसार त्याने हेडिंग्ले, लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळून आपला कोटा पूर्ण केला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत 33 षटकांत केवळ 2 बळी घेतल्याने त्याच्यावर थकव्याचा प्रभाव स्पष्ट जाणवला होता.
कसोटी जिंकणं टीम इंडियासाठी गरजेचं
ही कसोटी जिंकणं भारतासाठी अत्यावश्यक आहे, कारण सध्या मालिका 2-1 ने इंग्लंडकडे आहे. भारताला मालिकेची बरोबरी साधण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. पण दोन प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणं ही भारतासाठी खडतर परीक्षा ठरणार आहे.
नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी?
बुमराहच्या (Bumrah) अनुपस्थितीत आता कोणत्या गोलंदाजाला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मतानुसार, टीम इंडियाचे सर्व वेगवान गोलंदाज आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यामुळे आकाश दीप (Aakashdip) आणि अर्शदीप सिंग (Harshdeep) या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. आकाश दीपने आपल्या पदार्पणात प्रभावी खेळ दाखवला होता, तर अर्शदीपदेखील कसोटी पदार्पणाच्या उंबरठ्यावर आहे.
भारताच्या विजयासाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा असतानाही बुमराहचा संघातून बाहेर जाणं म्हणजे मोठा झटका. आता तरुण गोलंदाजांवर जबाबदारी येणार आहे. ते कसोटी रंगमंचावर कितपत चमकतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.