पाणी हे जरी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असले, तरी जर ते अशुद्ध असेल तर ते आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. पाईपलाईनमधील गळती, साठवणुकीतील अस्वच्छता किंवा इतर कारणांमुळे पाण्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर घातक सूक्ष्मजीव तयार होऊ शकतात. असे पाणी पिल्याने अतिसार, कॉलरा, टायफॉइडसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. लहान मुले, वृद्ध आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्यांना याचा फटका अधिक बसतो.
शुद्ध पाणी पिणे म्हणजे शरीराला निसर्गाने दिलेले संरक्षण. हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, पचनक्रिया सुधारते, त्वचेचा ओलावा टिकवते, तापमान नियंत्रित ठेवते आणि मूत्रपिंडांना योग्यरित्या काम करण्यास मदत करते. पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उकळणे हा एक प्रभावी मार्ग आहे. १ ते ३ मिनिटे पाणी उकळल्यावर अनेक जंतू नष्ट होतात, पण काही जिद्दी बॅक्टेरिया आणि रसायनांसाठी फक्त उकळणे पुरेसे नाही. म्हणूनच पाणी उकळण्याबरोबरच, गाळणे आणि साठवणुकीची स्वच्छता देखील महत्त्वाची ठरते.
काय लक्षात ठेवायचं?
पाणी उकळण्याआधी गाळून घ्या
१-३ मिनिटे पाणी उकळवा
उकळलेले पाणी झाकून स्वच्छ भांड्यातच ठेवा
साठवलेले पाणी वेळेवर वापरा आणि भांडे नियमित धुवा
अत्यंत अशुद्ध पाणी असल्यास फिल्टर वापरणे गरजेचे
स्वच्छ पाणी म्हणजे निरोगी आयुष्याची पहिली पायरी. त्यामुळे केवळ पाणी पिण्याचीच नाही, तर ते किती शुद्ध आहे याचीही काळजी घेणं गरजेचं आहे.