गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी वेग घेत आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या प्रक्रियेत एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नविन ‘दंड नियम’.
नवीन नियमानुसार, रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास संबंधित गणेश मंडळावर तब्बल 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याआधी हा दंड केवळ 2 हजार रुपये होता. म्हणजेच साडेसातपट वाढ झाल्यानं मंडळांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या मुद्द्यावर अनेक मंडळांनी ही कारवाई ‘अन्यायकारक’ असल्याचं ठामपणे मांडलं आहे. जनतेचा सूर लक्षात घेऊन भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत, “जुन्या नियमानुसार 2 हजारच दंड आकारण्याचा विचार करत आहोत”, असं स्पष्ट केलं.
याचसोबत, मुंबईतील महापालिका (BMC) आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय पुन्हा विचाराधीन घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे पुढील 10 दिवसांत बुजवले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने यंदाचा ‘श्रीगणेशोत्सव’ राज्य उत्सव म्हणून घोषित केला असून, मुंबई महापालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक आणि जलद परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.
हे सगळं पाहता, उत्सवाच्या तयारीसाठी मंडळे सज्ज असली तरी नवीन नियमांचा अडथळा आणि त्यावरचा सरकारी प्रतिसाद यामुळे गणेशभक्तांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे लागले आहे.