विमानाने प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचा अनुभवच असतो. उंच आकाशात विहरत असताना प्रवासाचा आनंद घेणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र या प्रवासात काही लहानशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जेवणाबाबत योग्य काळजी घेतली नाही तर पोटदुखी, गॅस, एलर्जी किंवा अपचनासारख्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. याच संदर्भात काही माजी एअर होस्टेसनी दिलेल्या टीप्स सध्या खूप चर्चेत आहेत.
विमानात ‘हे’ पदार्थ टाळाच
माजी फ्लाइट अटेंडंट एलेक्स क्विगली यांच्या मते, विमानात दिला जाणारा चहा किंवा कॉफी पिणं टाळावं. कारण हे गरम पेय पोर्टेबल वॉटर टँकमधील पाण्याने बनवलं जातं, आणि त्या टाक्यांची स्वच्छता नियमित होत नाही. त्यामुळे अशा पाण्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. तिचा स्पष्ट सल्ला आहे की, प्रवासात बाटलीबंद पाणी, ज्यूस किंवा कॅन ड्रिंक्स निवडावं.
विमानाच्या उंचीमुळे केबिनमधील प्रेशर बदलतो आणि त्यामुळे पोटात गॅस तयार होणे, फुगी येणे ही सामान्य समस्या आहे. सात वर्षांची अनुभवी एअर होस्टेस जोसेफिन रेमो सांगतात की फ्लाइटच्या आधी किंवा दरम्यान कांदे, बीन्स, मसूर, ब्रोकली, रेड मीट, ग्लूटेनयुक्त अन्न आणि कार्बोनेटेड पेये खाणं टाळावं. हे पदार्थ गॅस वाढवतात आणि पोटाचा त्रास होतो.
माजी एअर होस्टेस जॅकलिन व्हिटमोर यांचं म्हणणं आहे की, काही खाद्यपदार्थांचा वास इतका तीव्र असतो की तो संपूर्ण विमानात पसरतो आणि इतर प्रवाशांना त्रास होतो. अंडी, ट्यूना सँडविच, फिश डिशेस यांसारख्या पदार्थांपासून दूर राहणं केवळ सभ्यतेचा भाग नाही, तर तो आरोग्यासाठीही आवश्यक आहे. तसेच, अशा पदार्थांना योग्य तापमान मिळालं नाही तर ते लवकर खराब होतात आणि त्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.
काही लोकांना शेंगदाणे, पीनट बटर यासारख्या पदार्थांपासून गंभीर अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या पुरवठ्यासाठी हे पदार्थ नेणंही दुसऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं. कारण एअरबॉर्न पार्टिकल्समुळे इतर प्रवासीही प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे अॅलर्जीजन्य अन्न नेण्याआधी दोनदा विचार करा.
मग विमानप्रवासात काय खावं?
हलकं, पौष्टिक आणि लवकर खराब न होणारं अन्न निवडा
काही चांगले पर्याय:
फळांचे छोटे तुकडे
चीज स्टिक्स
भाज्यांचे छोटे स्लाइस
नट्स (अॅलर्जी नसल्यास)
मफिन्स, ग्रॅनोला बार
डार्क चॉकलेट
ओट्स किंवा सूपसारखे इन्स्टंट फूड्स (ज्यांना फक्त गरम पाण्याची गरज आहे) अशा प्रकारचे अन्न नुसतं आरोग्यदायी नसतं तर ते पचायला सोपंही असतं. त्याशिवाय, हे इतर प्रवाशांनाही त्रास न देता तुम्हाला उर्जावान ठेवतं.
स्मार्ट सल्ला
तुम्ही विमानात बसण्यापूर्वी हलकं अन्न खा. प्रवासात गरज असेल, तर फ्लाइट क्रूकडून गरम पाणी मागू शकता. आणि शक्य असल्यास, हायड्रेटेड राहणं अत्यंत आवश्यक आहे.