लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात सुरुवातीला सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र, आर्थिक ताणामुळे सरकारने त्यावर अटी आणि पात्रतेचे नियम लागू केले. यामुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले. पण धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा गैरफायदा अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं उघड झालं आहे.
अहवालानुसार, 9,526 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यामध्ये 1,232 निवृत्त महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना आधीपासूनच पेन्शन मिळत होती. उर्वरित 8,294 महिला कर्मचारी सध्या नोकरीत असूनही 1500 रुपये मिळवताना आढळल्या आहेत. या गैरफायद्याची एकूण रक्कम सुमारे 12 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
योजनेचा लाभ घेण्याचे नियम असूनही काहींनी इतर सरकारी योजना सुरू असताना लाडकी बहीण योजनेसाठीही अर्ज केला. काही पुरुषांनी देखील या योजनेचा फायदा घेतल्याचे उघडकीस आले असून हे देखील धक्कादायक आहे.
या सर्व प्रकारामुळे आता राज्य सरकार काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चुकीने पैसे घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे, तर लाभ घेतलेल्या पुरुषांवर कायदेशीर कारवाई होणार का, हाही मोठा प्रश्न आहे.
तसंच, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी योजनेच्या जाहिरातीतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी जाहिरातसाठी 200 कोटींची मर्यादा असलेला निर्णय (जीआर) होता, पण 23 नोव्हेंबर 2023 च्या जीआरमधून काही ठरलेल्या संस्थांना काम न देता इतर संस्थांना दिलं गेलं, हे भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याचं ते म्हणाले.