पुण्यातील खराडी परिसरात एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला आणि यावेळी राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) हेही तिथे उपस्थित असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिगारेटच्या पाकिटात लपवून ठेवलेल्या कोकेनच्या तीन पुड्या जप्त केल्या असून, या पार्टीत महिलांसह अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर खुद्द एकनाथ खडसे (Eknath Khadse)आणि त्यांची कन्या रोहिणी खेवलकर (Rohini Khewalkar) यांचाही पाठिंबा प्रांजलसाठी पाहायला मिळतोय. खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्या जावयाने आयुष्यात कधी ड्रग्स पाहिलेही नाहीत.”
या घटनेनंतर राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काही नेत्यांनी या कारवाईबाबत शंका उपस्थित केली असून, पुणे पोलिसांवरच बोट दाखवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुलासा केला की, खेवलकर खडसे यांचा जावई असल्याची माहिती कारवाईनंतरच समजली.
सध्या पोलिस तपास सुरू असून, आरोपींच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमकं कोण ड्रग्स घेत होते, हे स्पष्ट होईल. या पार्टीचं बुकिंग देखील खेवलकर यांच्या नावावरच करण्यात आले होते आणि व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवरून काही आरोपींनी पूर्वी संपर्क साधल्याचे समोर आले आहे.
पार्टीत नेमके कोण कोण होते, ड्रग्स कुणी आणले, आणि आणखी कुणाचा सहभाग होता याचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या अजून गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.