पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी देशातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या बंगाली प्रवासी मजुरांना परत यावं, असं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, तुम्ही मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये राहण्याची गरज नाही. बंगालमध्ये तुम्हाला सामाजिक सुरक्षा आणि आधार मिळेल.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी तुम्हाला खास पदार्थ देऊ शकत नाही, पण आम्ही जे खातो तेच तुम्हालाही मिळेल, याची हमी देते.” त्यांनी सांगितलं की, तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला परत आणण्याची व्यवस्था करू.
याचवेळी त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. त्या म्हणाल्या की, हे दोघं मिळून बांग्ला भाषिक लोकांविरोधात NRC (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मागच्या दरवाजाने लागू करण्याचा कट रचत आहेत. मतदार यादीतून गरीब, अल्पसंख्यांक आणि बांग्ला भाषिकांची नावं हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बोलपूर येथून त्यांनी ‘बांग्ला भाषा आंदोलन’ सुरू केलं आहे. तिथे त्यांनी ठामपणे सांगितलं की, “मी जिवंत आहे तोपर्यंत बंगालमध्ये NRC लागू होणार नाही. नावं हटवली गेली, तर त्याचे गंभीर परिणाम होतील.”