राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Self Government Election) होणार आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली. दरम्यान, कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पक्षातील अंतर्गत वादावरून कान टोचले. आपसातील भांडणं मिटवा. आपआपसातील वादामुळे अनेकांचं पतन झालं. जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्डयात घालण्याचं काम पक्ष करेलं, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला
भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ध्यात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, आपल्याला आता तयारीला लागायला पाहिजे. जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यापैकी एकाच्या निवडणुका आधी होतील आणि शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील. 2017 मध्येही अशाच प्रकारे तीन टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. त्याच प्रमाणे निवडणूक आयोग या निवडणुका घेईल, असं ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाद उकरून काढले जातील. आपण केलेले काम लोकांना समजू नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही त्यांनी असे वाद उभे केले. पण, आपण आपले काम घेऊन जनतेमध्ये गेलो आणि लोकांनी आपल्याला मतदान केलं. त्यामुळं आताही आपल्याला लोकांमध्ये जाऊ सरकारने केलेले काम आणि सरकारचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडायचे आहे.
माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, राज्यात आपल्यासाठी अनुकूलता आहे. लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत. पण, भाजप पक्ष म्हणून अनेक जिल्ह्यांत लहानसहान वाद आहेत. हे वाद नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत. हे वाद फार मोठे नाहीत. भाजप एक परिवार आहे. कुटुंबात कमी जास्त होत असते. पण, निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र बसलं पाहिजे आणि वाद संपवले पाहिजेत. हे बघा, एकमेकांच्या चढाओढीमुळं अनेक पक्ष संपले. असे प्रकार आपल्या पक्षात होऊ नयेत. जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्डयात घालण्याचं काम पक्ष करेलं, हे लक्षात ठेवा, असा इशारा फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला.