पुण्यातील रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी रात्री उशीरा छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही पार्टी सुरू होती. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा या पार्टीत समावेश असून तीन महिलांसह दोन पुरूषांचा ताब्यात घेण्यात आलंय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असून एकनाथ खडसे हे गिरीष महाजन यांच्यावर टीका करत असताना ही छापेमारी झाल्याने शंका व्यक्त केली जात आहे.
खडसेंचे जावई वगळता इतर पार्टीमध्ये सहभागी असलेल्यांची नावे ही अजून पुढे येऊ शकली नाहीत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या जावायला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली असून राजकीय भूंकप आलाय. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे मंत्री गिरीष महाजन यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता त्यांच्या जावायला ताब्यात घेतले आहे. यावरून संजय राऊत यांनी थेट गिरीष महाजन यांच्यावर आरोप केले आहेत.
Pune Rave Party घटनास्थळी काय सापडलं?
अमली पदार्थ, विविध प्रकारची दारू आणि हुक्का उपकरणं पोलिसांनी घटनास्थळी जप्त केली आहेत. याशिवाय ड्रग्जच्या सेवनाचे पुरावेही ताब्यात घेतले आहेत. ते न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या पार्टीतील काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्सचा वापर झाल्याची पुष्टी झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
Pune Rave Party गुन्हे शाखेची कारवाई
पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा या ठिकाणी छापा टाकला. खराडी भागातील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असल्याची माहिती आधीपासूनच पोलिसांकडे होती. कारवाई दरम्यान कुठलाही विरोध न करता सर्व उपस्थितांना ताब्यात घेण्यात आलं.
या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. संबंधित नेत्या रोहिणी खडसे यांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. “नैतिकतेचे डोस देणारेच अशा गोष्टीत सापडले, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका विरोधकांनी केली.