आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत डोकेदुखी होणं अगदी सामान्य झालं आहे. कामाचा ताण, जबाबदाऱ्या, आर्थिक ओझं या सगळ्यामुळे अनेक वेळा आपल्याला डोकेदुखीचा सामना करावा लागतो. (Vidya Balan Headache Remedy) अशा वेळी बऱ्याचदा आपण कुठलाही विचार न करता पेनकिलर घेतो आणि पुन्हा धावपळीत गुंतून जातो.
पण बॉलिवूडची गुणी अभिनेत्री विद्या बालन मात्र वेगळीच पद्धत वापरते – आणि तिचा हा उपाय सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजतोय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने सांगितलं की, ती डोकेदुखी झाली की कुठलाही गोळ्या न घेता एक वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारते – “Headache, you can leave now” (हेडेक, तू आता निघून जाऊ शकतोस). विद्याच्या मते, हा छोटासा मंत्र मन शांत करण्यास आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो. विचारांची दिशा बदलली की शरीरही प्रतिसाद देतं – असं तिचं स्पष्ट मत आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही पद्धत प्लेसिबो इफेक्ट किंवा माइंडफुलनेस टेक्निकचा भाग असू शकते. सतत सकारात्मक विचार केल्याने ताण कमी होतो आणि त्यामुळे डोकेदुखीही ओसरते. मात्र जर डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा ती मायग्रेनसारखी तीव्र असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
विद्या बालन तिच्या हटके विचारांसाठी आणि सशक्त अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असते. आजही ती सोशल मीडियावर आपल्या हटके पोस्ट्समुळे चाहत्यांच्या जवळ आहे. तिचं हे खास डोकेदुखीचं “ट्रिक” अनेकांना एक वेगळा दृष्टिकोन देतंय – कारण कधी कधी उपाय औषधात नसतो, तर विचारात असतो!