दक्षिणेचा धडाकेबाज अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी कारण आहे त्याचा आगामी अॅक्शनपट – ‘किंगडम’! अजून पाच दिवसांनी हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार असतानाच, नॉर्थ अमेरिकेत त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
अमेरिकेतील 220 ठिकाणी आतापर्यंत 7000 पेक्षा जास्त तिकिटं विकली गेली असून, चित्रपटाने आधीच 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावरून स्पष्ट होतं की विजयच्या चाहत्यांनी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बाहुबली, पुष्पा, कल्की 2898 AD, सलार अशा चित्रपटांनी नॉर्थ अमेरिकेत तेलुगू सिनेमांची लोकप्रियता वाढवली आहे. त्याच पावलावर चालत ‘किंगडम’ देखील त्या यशाच्या मार्गावर आहे असं चित्र आहे.
विजय देवरकोंडा या चित्रपटातून मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकतोय, आणि त्याच्या नव्या अंदाजातील अॅक्शन अवताराची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ‘किंगडम’ला सेन्सॉर बोर्डाकडूनही हिरवा कंदील मिळालेला असून, लवकरच ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केलं असून, विजयसोबत भाग्यश्री बोरसे झळकणार आहे.