आजच्या घाईगडबड आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देता येत नाही. त्यातच चुकीच्या आहार आणि वेळच्यावेळी न खाण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. विशेषतः बद्धकोष्ठतेसारखी समस्या आता सामान्य बनली आहे. यावर घरगुती उपाय म्हणून नारळ पाणी एक प्रभावी पर्याय ठरू शकतो, पण त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपातच करणे आवश्यक आहे.
नारळ पाणी का आहे उपयुक्त?
नारळ पाणी म्हणजे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा खजिना. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक पचनसंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. मॅग्नेशियम आतड्यांमध्ये पाणी खेचून मल मऊ बनवतो, तर पोटॅशियम आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतो. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
संशोधन काय सांगतंय?
एका वैद्यकीय अभ्यासानुसार, नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने सौम्य बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की नारळ पाण्यात फायबरचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे ते एकटं पुरेसं ठरत नाही. पचन सुधारण्यासाठी अतिरिक्त फायबरयुक्त आहाराची जोड गरजेची आहे.
जास्त पिलं तर काय होऊ शकतं?
नारळ पाणी किती प्यायचं याचं प्रमाण देखील महत्त्वाचं आहे. दररोज 1 ते 2 ग्लास नारळ पाणी पचण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र 10-12 ग्लास पिणं टाळावं, कारण त्यातील मॅग्नेशियम जास्त प्रमाणात घेतल्यास पोट सैल होण्याची शक्यता असते. तसेच, जर आपल्याला किडनीसंबंधित आजार, हाय पोटॅशियम किंवा रक्तदाब कमी असल्याची तक्रार असेल, तर नारळ पाणी पिण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून काय घ्यावं?
जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर फक्त नारळ पाण्यावर अवलंबून न राहता खालील गोष्टींचाही समावेश करा: भरपूर पाणी प्या (कमीत कमी 2.5 ते 3 लिटर दररोज) आहारात फायबरयुक्त पदार्थांचा (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य) समावेश करा. सकाळी एक चमचा सायलियम हस्क (इसबगोल) कोमट पाण्यासोबत घ्या. नियमित व्यायाम करा. ताक, फळांचा रस किंवा ओट्स पाणीसारखे नैसर्गिक पर्याय निवडा
नारळ पाणी हे एक नैसर्गिक, सुरक्षित आणि फायदेशीर पेय आहे. मात्र कोणत्याही समस्येवर ते एकमेव उपाय नसून, ते संपूर्ण आहार आणि जीवनशैलीचा एक भाग असावा. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य संयोजन केल्यास नारळ पाणी पचनसंस्थेला ताकद देतं आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकायला मदत करतं.