देशाच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (हिंद स्वराज्य संघ) यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. टिळकांची १०५ वी पुण्यतिथी असलेल्या शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि अजित पवार (Ajit pawar), तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilumar Shinde) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक (Rohit Tilak) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. या सन्मानात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १ लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
टिळक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले की, “स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण” या **लोकमान्य टिळकांच्या चार सूत्रांनुसारच गडकरी देश उभारणीचे कार्य करत आहेत. त्यांनी देशभरात महामार्गांचे जाळे विणले, ‘नमामी गंगे’सारखा प्रकल्प जनआंदोलनात रूपांतरित केला आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे पायाभूत विकासाला गती दिली.”
हा पुरस्कार १९८३ पासून दिला जात आहे. एस. एम. जोशी हे पहिले पुरस्कार विजेते होते. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला यांच्यासारख्या दिग्गजांनी हा सन्मान स्वीकारलेला आहे.
या वर्षीच्या पुरस्कार वितरण समारंभात, आजवरच्या सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला जाणार असून, त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी टिळक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक, सरिता साठे, रामचंद्र नामजोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील.
गडकरी यांचा विकासाचा दृष्टिकोन केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून तो स्वदेशी उद्योग, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समावेशन या मुद्द्यांनाही स्पर्श करतो. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळणे हे केवळ वैयक्तिक गौरव नसून देशाच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाची मान्यता मानली जात आहे.