गणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसतसे कोकणातील चाकरमान्यांचे पाऊले गावाकडे वळू लागले आहेत. दरवर्षी रेल्वे आणि एसटीच्या तिकीटांसाठी झुंबड उडते, तर दुसरीकडे महामार्गांवरील वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते आणि पावसामुळे प्रवासाचा त्रास अधिकच वाढतो. या पार्श्वभूमीवर यंदा कोकण रेल्वेने एक अभिनव सुविधा सुरू केली आहे. ‘रोल ऑन रोल ऑफ’ (Ro-Ro) सेवा, जी खासगी वाहनधारक प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे.
२३ ऑगस्टपासून सुरू झालेली ही सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड स्टेशन येथून गोव्यातील वेर्णा स्टेशनपर्यंत सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांना आता त्यांच्या स्वतःच्या कारसह रेल्वेने कोकणात जाता येणार आहे. ही सेवा रात्रीच्या प्रवासासाठी अनुकूल असून, सायंकाळी ५ वाजता कोलाडहून गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहोचेल. तसेच वेर्णाहूनही संध्याकाळी ५ वाजता ही गाडी परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असेल.
‘रो-रो’ सेवा म्हणजे काय?
ही सेवा मालवाहू ट्रकप्रमाणे खासगी गाड्यांसाठी आहे. कार थेट रेल्वेच्या विशेष डब्यात चढवली जाते आणि ती कोकण रेल्वेच्या मार्गावरून गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचवली जाते. प्रवाशांनाही त्यांच्या गाडीसोबत रेल्वेने प्रवास करता येतो. यामुळे ना रस्त्यावरील खड्डे, ना पावसाचे धोकादायक प्रवास, ना ट्रॅफिकचा त्रास फक्त आरामदायी रेल्वे प्रवास.
प्रवासासाठी एका कारसाठी ७,८७५ रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्या वाहनासोबत तीघांपर्यंत प्रवाशांना एसी कोच किंवा एसएलआर डब्यात प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मात्र, गाडी लोडिंगसाठी आणि तपासणीसाठी प्रवासाच्या किमान तीन तास आधी स्टेशनवर हजर राहणे बंधनकारक आहे.
ही सुविधा केवळ वेळ आणि पैशाची बचत करणारी नसून, पर्यावरणपूरकही आहे. एकाच रेल्वेगाडीत अनेक कार्स आणि प्रवासी एकत्र वाहून नेले जात असल्याने इंधन बचत होते आणि रस्त्यांवरील वाहनांची गर्दीही कमी होते.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही ‘रो-रो’ सेवा एक सुवर्णसंधी असून आरक्षण लवकर करणे गरजेचे आहे. अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच या मार्गावर सुरू करण्यात येत असून, भविष्यात या सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या सणात जिथे प्रवास म्हणजे एक लढाई असते, तिथे ही नवी सेवा एक दिलासादायक बदल घेऊन आली आहे.