अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. या पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, खासदार तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये राडा झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पत्रकार परिषदेतत्यामुळं छावा संघटनेचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी गोंधळ घातला. तसेच त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, याबाबत निवेदन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना दिलं. तटकरे यांनी देखील विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं. पण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यावर पत्ते फेकले. त्यामुळं मोठा राडा झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
तटकरेंवर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे देखील दिसत आहेत. या राड्यात छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना तुफान मारहाण झाली. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तेथून सोडण्यात आले. या राड्यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते.
Sunil Tatkare कोकाटे प्रकरणावर अजितदादांचे मौन
विधान परिषदेत कोकाटे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर बोलणे टाळले. याविषयी एकही शब्द ते पुण्यात माध्यमांना न बोलता निघून गेले.