टेलिव्हिजनवरचा सर्वात महागडा होस्ट म्हटलं की लगेच डोळ्यापुढे येतो सलमान खानचा चेहरा (Salman Khan) ‘बिग बॉस’ (Bigg Boss) सारख्या गाजलेल्या रिअॅलिटी शोचं दमदार सूत्रसंचालन करत सलमाननं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक वर्षं सलमान खान याने ‘सर्वात जास्त मानधन घेणारा होस्ट’ हा टायटल कायम राखला होता. पण आता ही जागा त्याच्या हातून निसटली असून, ही मान्यता मिळाली आहे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना.
Siasat.com च्या रिपोर्टनुसार, ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या सर्वाधिक लोकप्रिय क्विझ शोच्या 17 व्या सीझनसाठी बिग बी दर एपिसोडसाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेत आहेत. हा शो आठवड्यातून पाच दिवस सोमवार ते शुक्रवार प्रसारित होणार असल्याने, त्यांचं साप्ताहिक मानधन तब्बल 25 कोटी रुपयांवर पोहोचतं. त्याच वेळी, बिग बॉस ओटीटी 2 दरम्यान सलमान खानला वीकेंडचा प्रत्येक एपिसोड म्हणजे ‘वीकेंड का वार’साठी 12 कोटी रुपये दिले जात होते. आठवड्याला फक्त दोन दिवस शूट करत असलेल्या सलमानचं साप्ताहिक मानधन सुमारे 24 कोटी रुपये होतं. म्हणजेच, आता बिग बीनं सलमान खानलाही मागे टाकत ‘टीव्हीवरील सर्वात महागडा होस्ट’ हा टायटल आपल्या नावावर केला आहे.
ताज्या अपडेटनुसार, KBC चा 17 वा सीझन येत्या 11 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. सोनी टीव्हीनं नुकताच अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) यांचा एक प्रोमो शेअर केला असून, तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शोच्या नव्या हंगामाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
एकीकडे रिअॅलिटी आणि क्विझ शोजचा दर्जा आणि लोकप्रियता झपाट्यानं वाढतो आहे, तर दुसरीकडे या शोजमधील होस्ट्सचं मानधनही कोटींच्या घरात पोहोचत आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या या पैशांच्या खेळात आता बिग बी नं पुन्हा एकदा आपली बादशाही सिद्ध केली आहे!