22.8 C
New York

CM Devendra fadnavis : भाजपची महापालिका रणधुमाळीत फडणवीसांची बैठक काय असणार संघाचीही सक्रिय भूमिका?

Published:

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मराठवाडा विभागातील आमदारांना थेट मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत फडणवीसांनी स्पष्टपणे सूचित केले की, भाजपने या निवडणुकांमध्ये राज्यात नंबर एकचा पक्ष ठरले पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदाराने युद्धपातळीवर काम करावं.

मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील पाच अत्यावश्यक कामांची यादी तातडीने सादर करण्यास सांगितले. ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी यंत्रणांशी समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे मतदारांमध्ये विश्वास वाढेल आणि भाजपच्या विकासनितीची प्रभावी प्रतिमा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, स्थानिक समित्यांच्या नियुक्ती आणि कामकाजाचे अधिकार आता थेट आमदारांना दिले जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे स्थानिक स्तरावर निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत फडणवीसांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला पक्षातील एकजूट. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आमदारांचा सल्ला घेतला जाईल, असे सांगत त्यांनी पक्षातील नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची भावना बळकट करण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, भाजप प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली असून, मुंबईसह विदर्भ, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी आणि आमदार या बैठकीत सहभागी होणार आहेत. संघाचे काही वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निवडणूकपूर्व संघटनात्मक कामकाज, बूथ रचना, प्रचार मोहिमा, आणि जनसंपर्क अभियान यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघ या दोघांच्या समन्वित प्रयत्नांमुळे भाजप आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, भाजपच्या पुढील प्रत्येक हालचालीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img