संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Attack) यांच्यावर काल अक्कलकोट येथे काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना येथील शिवधर्म फाउंडेशनच्या लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळी शाई फेकली व त्यांना मारहाण केली. यावर विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
‘शिवधर्म फाउंडेशन’च्या नावाखाली हे लोक काम करतात. या प्रकरणी दीपक काटे (भाजप युवा मोर्चा – राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमाला प्रवीण गायकवाड हे जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांचा काय दोष होता? कुठलं कारण असावं? त्यांच्या संस्थेचे नाव संभाजी आहे, इतकंच का असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला.
अनेकांनी आपलं नाव बदलून संभाजी ठेवलं आहे, त्यांना मारहाण झाली का? असं म्हणत त्यांनी नाव न घेता संभाजी भीडे यांना टोला लगावला आहे. ही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचार प्रणालीवर काम करणारी आहे. परंतु, ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यांना अमानुषपणे गाडीतून उतरवून काळे फासण्यात आलं. नुसते काळे फासले नाहीतर कॉलर धरून ओढून खाली पाडले, प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला असा थेट घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे.
Devendra Fadnavis गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली आहे. ही वस्तुस्थिती आहे की, ज्या आरोपींनी हल्ला केला त्यांनी तुम्ही संभाजी नाव काय ठेवलं? छत्रपती संभाजी का ठेवलं नाही? अशा प्रकारचा वाद तयार करून त्यांच्यावर हल्ला शाई फेकली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचले होते. पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली की, आपण या संदर्भात फिर्याद द्या. मात्र ते फिर्याद द्यायला तयार नव्हते. पोलिसांनी तरी देखील फिर्याद घेतली आणि आरोपींना तत्काळ अटक करण्यात आलेली आहे. आरोप अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडमवीस म्हणाले आहेत.