राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Nashik Accident) चालली आहे. भरधाव वेगात असलेल्या वाहनाचे नियंत्रण सुटून जास्तीत जास्त अपघात होत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात नाशिक (Road Accident) जिल्ह्यात घडला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त रामदास बाबा मठातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ ही घटना घडली. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा कंटेनर पलटी होऊन चारचाकी गाडीवर जाऊन पडला. काही अंतर गाडीला फरपटत घेऊन गेला, असे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंटेनर कारला धडकल्याचेही काही जणांकडून सांगण्यात येत आहे. अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती पोलीस तपास झाल्यानंतरच समोर येईल. या अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस, महामार्ग पोलीस, टोलनाका पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर पडल्याने कारचा चुराडा झाला होता. त्यामुळे या वाहनातील दबलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही यावेळी यंत्रणांची मदत केली.
अपघातात मयत झालेले सर्वजण हे मुंबईतील अंधेरी (Mumbai News) येथील रहिवासी होते. गुरूपौर्णिमेनिमित्त मठात दर्शनासाठी आले होते. दर्शनाहून परतत असतानाच हा अपघात (Road Accident) झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही केली जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चौघा बहिणभावांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. हे चारही जण एकाच कुटुंबातील असून बहीण भाऊ आहेत. चारही मयतांची ओळख पटली असून चारही जण सख्खे बहीण भाऊ आहेत. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.