मुंबईतील बहुप्रतिक्षित कर्नाक ब्रिज अखेर पूर्ण झाला आणि आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र आता या ब्रिजचे नाव कर्नाक नसून सिंदूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवार) सिंदूर पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा आयुक्त भुषण गगराणी उपस्थित होते. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मात्र अनुउपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. कर्नाक ब्रिजचे नाव बदलण्यामागे गुलामगिरीच्या काळातील खुना पुसण्याचे कारण मुख्यमंत्र्यांनी दिले.
Devendra Fadnavis इतिहासाची काळी पाने पुसली पाहिजे…
अनेक वर्षे या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण ओळखत होतो. कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर होता. स्वकियांवर अत्याचार करणारा हा गव्हर्नर होता. प्रबोधनकार ठाकरेंनी या कर्नाकचा इतिहास लिहून ठेवले आहे. त्यांनी साताऱ्याचा इतिहास लिहिला आहे. त्यात प्रतापसिंह छत्रपती आणि रंगोबापू असे एक प्रकरण आहे. त्यात या कर्नाकने छत्रपतींनी बंडाच्या आणि खूनाच्या आरोपात फसवण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रतापसिंह राजे त्याला पुरुन उरले, याचे वर्णन प्रबोधनकार ठाकरेंनी केले आहे. भारतीयांवर अत्याचार करणारा कर्नाक होता. या काळ्या इतिहासाची पाने पुसली पाहिजे, म्हणून या उड्डाणपुलाचे नाव बदलण्यात आले. भारतीय सैन्याने जे अतुलनीय शौर्य दाखवले त्या ‘सिंदूर ऑपरेशन’चे नाव या उड्डाणपुलाला देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय महत्त्वाचा असलेल्या सिंदूर उड्डाणपुल पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिज याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेने अतिशय कमी वेळामध्ये उत्कृष्ट बांधकाम या पुलाचे केले आहे. रेल्वेवरील आणि गर्दीच्या भागातील हा पुल असल्यामुळे याच्या बांधकामात अनेक अडचणी होत्या. असे असतानाही जो निर्धारित वेळ दिला होता त्या कालावधीत बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी आणि त्यांचा टीमने वेळेत हे काम पूर्ण केले.
दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी सिंदूर उड्डाणपुल अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. मशीद बंदर रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेला हा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाची लांबी 342 मीटर आहे. रेल्वे हद्दीमध्ये 70 मीटर असून महापालिका हद्दीमध्ये 230 मीटर आहे. आज दुपारी 3 वाजतापासून सिंदूर पूल सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.