आज मीरारोड-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “सरकारकडून मराठी माणसाच्या आवाजाला पायदळी तुडवलं जातंय, आणि अमराठी व्यापाऱ्यांना खुलेआम परवानग्या दिल्या जात आहेत. मग हे सरकार नक्की कोणाचं? महाराष्ट्राचं की गुजरातचं?”
देशपांडे यांचा संताप इतकाच नव्हता, ते पुढे म्हणाले की, “त्या दिवशी सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले आणि मोर्चा काढला, त्यावेळी मीरारोड-भाईंदर पोलीस झोपले होते का? त्यांना परवानगी मिळते आणि आम्हाला म्हणजेच मराठी जनतेला नाकारली जाते, हा खुला दुटप्पीपणा आहे.”
त्यांनी स्पष्ट केलं की, सरकारने त्यांच्या नेत्यांना अटक करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, पण “मराठी माणसाची चळवळ अशी थांबत नाही, एक नेता अडवला तरी हजारो सामान्य मराठी माणसं पुढे येतील आणि नेतृत्व करतील.”
देशपांडे यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “भाजपचे काही नेते – दुबे वगैरे – जाणीवपूर्वक भडकावू विधानं करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात दंगल घडवून आणायची आहे. हे सगळं राजकीय हेतूनं केलं जातंय – बिहार निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असं विष पेरलं जातंय.”
सरकारने जर व्यापाऱ्यांना मोर्चासाठी ‘खुली सूट’ दिली असेल, तर मराठी जनतेला अटक कशी योग्य? “नरेस, सूरेस, परेस यांना सूट आणि आम्हाला नोटीस?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थीत केला.
ते म्हणाले, “हे सरकार जर मराठी माणसाचं दडपण करत असेल, तर आम्ही या राजकीय दहशतीसमोर नक्कीच झुकणार नाही. मोर्चा निघणार म्हणजे निघणारच!”
मनसेचा मोर्चा स्थानिक मराठी व्यापार्यांच्या हितासाठी होता, जो एका बिल्डरविरोधातील कारवाईच्या संदर्भात आयोजित करण्यात आला होता. मात्र व्यापारी संघटनांनी विरोध केला आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं. सरकारचा विरोध निवडणूकपूर्व ध्रुवीकरणाचाही भाग असल्याची शंका मनसेकडून व्यक्त केली जात आहे.