मीरा-भाईंदर शहर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. मराठी-हिंदी भाषिक वादाचा भडका उडाल्यानंतर, या भागात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पोलिस प्रशासनाने या मोर्चाला परवानगीच नाकारली.
यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक मराठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत जमावाला हटवण्यास सुरुवात केली आणि काही ठिकाणी धरपकड सुरू झाली. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
सरनाईकांचा पोलिसांना थेट इशारा:
प्रताप सरनाईक यांनी म्हटलं, “मी आता मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे. पोलिसांमध्ये दम असेल तर मला अटक करून दाखवावं.” त्यांनी स्पष्ट केलं की, शांततेत परवानगी मागूनही जर मोर्चा रोखण्यात आला, तर ती सरकारची दडपशाहीच म्हणावी लागेल. ते म्हणाले की, “कालपासून पोलिसांनी ज्या मराठी बांधवांची धरपकड केली आहे, ती पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो.”
अरविंद सावंत यांचा भाजपवर संताप:
या मोर्चासंदर्भात शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून मराठी अस्मितेसाठी होता. मात्र राज्य सरकारनं त्यालाच थोपवून, मराठी जनतेचं गळेकापू धोरण उघड केलं आहे. आज कार्यकर्त्यांना अटक झाली म्हणजे ही तर लहान आणीबाणीच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
त्यांनी भाजपवर संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत म्हटलं, “निवडणुका न घेणं, प्रशासनाच्या नावावर दडपशाही करणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. भाजपने ‘संविधान हत्या दिन’ साजरा केला, हेच त्यांचं खरे स्वरूप आहे.”
बिहारच्या निवडणुकीशी कनेक्शन?
अरविंद सावंत यांनी भाजपवर बिहारसाठी मुद्दाम मराठी विरुद्ध हिंदीचं नाटक रचल्याचा आरोप करत म्हटलं की, “सुशांत सिंह प्रकरणात जसं त्याचा फोटो वापरून भावनिक राजकारण केलं, तसंच आता बिहार निवडणुकांसाठी मराठी जनतेला उकसवून एका विशिष्ट नॅरेटिव्हची तयारी केली जात आहे.”
काही दिवसांपूर्वी एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला होता. मनसेने त्या मोर्चाच्या विरोधात उत्तर देण्यासाठी मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी त्यास परवानगी नाकारली, त्यामुळे मराठी जनता अजूनच संतप्त झाली आहे.
राज्यात भाषा, अस्मिता आणि राजकीय समीकरणे या तिघांचं नाट्य नवीन वळण घेत आहे.
मीरा-भाईंदरचा मराठी मोर्चा केवळ भाषेचा मुद्दा न राहता, आता तो राजकीय स्फोटक ठरण्याच्या वाटेवर आहे. मराठी अस्मितेच्या झेंड्याखाली पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या भावना उफाळून आल्या आहेत. प्रताप सरनाईक आणि अरविंद सावंत यांचं थेट सरकारविरोधात उघडपणे मैदानात उतरलेलं पाहता, आगामी काळात ही चळवळ आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.