अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या दिशा सालियन प्रकरणात आता वेगळी माहिती समोर आली आहे. दिशा सालियन हिने आत्महत्याच केली आहे. विविध पुराव्यांचा दाखला देत पोलिसांनी उच्च न्यायालयात दावा केला आहे की या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही तसेच तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार देखील झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या याचिकेवर पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अशी माहिती समोरल येत आहे
दिशा हिची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या प्रतिज्ञापत्रात, सतीश सालियन यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन केले आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हे नमूद केले आहे. तसेच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सातत्य असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्या वेळी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
Aditya Thackeray याचिका ही राजकीय सूडबुद्धीने -आदित्य ठाकरे
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपले नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावा ठाकरे यांनी याचिकेत केला आहे.