गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. (Rain Alert) पण बुधवारी (ता. 21 मे) रात्री मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास मुंबईत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. ज्यानंतर याचा परिणाम आज गुरुवारी (ता. 22 मे) सकाळी लोकल सेवेवर झाल्याचे दिसून आले. पण पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज गुरुवारी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही आज पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तळकोकणातील अनेक भागात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ जालिंदर साब यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Rain Alert मे महिन्यात का पडत आहे पाऊस
गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मे महिन्यात राज्यात इतका जोरदार पाऊस अत्यंत दुर्मिळ आहे. यंदा मान्सून अंदामान-निकोबारमध्ये लवकर सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीलाच प्री-मान्सून दिसतो. पण यावर्षी वातावरणातील बदलांमुळे प्री-मान्सून पावसाला लवकर सुरुवात झाली आहे.
Rain Alert विदर्भ, मराठवाड्यात पाऊस
विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री धारशिवमध्ये संततधार पाऊस बरसला. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पावसाने बुधवारी रात्री दमदार बॅटिंग केली. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या पावसाळी कामांची पोलखोल झाली. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात कांदे सडले आहेत.
Rain Alert पुणे, मुंबईत पाऊस
मुंबई, पुण्यात बुधवारी रात्री पाऊस झाला. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे ५४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करून रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव आणि अंधेरी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.