ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने (Ind vs pak war) गुरुवारी (ता. 8 मे) एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने पाकड्यांचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले असून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे एकूण 50 ड्रोन पाडल्याची माहिती सूत्रांच्यामाध्यमातून समोर आली आहे. पाकिस्तानकडून उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य हे ड्रोन हल्ले करण्यात आले होते. पण भारताने हे सर्व हल्ले परतावून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याने एल-70 विमानविरोधी तोफा, झू-23 मिमी तोफा, शिल्का प्रणाली आणि इतर आधुनिक काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोनच्या हल्ल्याचे व्हिडिओ भारतीय सेनेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 8 आणि 9 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांता वापर करून जोरदार हल्ला केला. परंतु, भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून करण्यात आलेले ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतावून लावण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या सर्व नापाक कटांना भारतीय सैन्याने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.
तर, पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच हे हल्ले आपण केले नसल्याचे म्हटले आहे. भारताकडून करण्यात येणारे दावे हे पूर्णतः निराधार असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तानविरोधात चुकीची माहिती देत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, भारतीय सैन्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून सैन्याच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पण पाकिस्तानचा हा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. त्यामुळे कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.