भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. (Ind vs pak war) ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाने (BSF) दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने किमान सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. इतकंच नव्हे तर धंधार इथल्या पाकिस्तानी चौकीचंही भारतीय सैन्याने मोठं नुकसान केलंय. याच पोस्टमधून घुसखोरीचे प्रयत्न केले जात होते.
“8 आणि 9 मे रोजी बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशवाद्यांच्या घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. किमान सात दहशतवाद्यांना सैन्याने ठार मारलंय आणि पाकिस्तान चौकी धंधारचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय”, अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. त्यांनी चौकी उद्ध्वस्त केल्याची थर्मल इमेजर क्लिपसुद्धा शेअर केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्य अत्यंत सतर्क आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रांवर आणि लपण्याच्या ठिकाणांवर यशस्वीरित्या हल्ले केले. त्यानंतर गुरूवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी घुसखोरीचे प्रयत्न केले. त्याचवेळी पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेरमधील वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला.
रात्रीच्या वेळी लष्कराची एक तुकडी सीमेवर गस्त घालत होती. त्यावेळी त्यांची नजर या दहशतवाद्यांवर पडली. रात्री 11.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सैनिकांनी अडवल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सैनिकांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या बाबतीत सांबा हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इथं दक्षता वाढवण्याचं हेच कारण आहे.