सोशल मीडिया हे आजच्या काळात स्वतःची मतं मांडण्यासाठी सर्वात प्रभावी व्यासपीठ मानलं जातं. एखादी महत्त्वाची घटना घडली की सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात — काही जण प्रश्न विचारतात, तर काही ठोस मत नोंदवतात. पण जर एखादा प्रसिद्ध व्यक्ती इतक्या गंभीर विषयावर काहीच न बोलता फक्त मौन पाळत असेल, तर त्यावर चाहते नाराज होणं साहजिक आहे. सध्या अशीच परिस्थिती अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्याबाबतीत दिसून येत आहे. नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असलेले बिग बी सध्या देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींवर काहीही न बोलता केवळ रिकाम्या पोस्ट्स करत आहेत, ज्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज आहेत.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि अनेक कलाकार, क्रीडापटू, सामान्य नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध करत आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
पण नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारे अमिताभ बच्चन यांनी या मुद्द्यावर एक शब्दही न बोलता केवळ ‘ब्लँक ट्विट्स’ म्हणजे रिकाम्या पोस्ट लिहिणं सुरू ठेवलं आहे. 22 एप्रिल रोजी त्यांनी शेवटचं स्पष्ट मजकूर असलेलं ट्विट केलं होतं. त्यानंतर दररोज केवळ ट्विटचा क्रमांक लिहून पोस्ट करत आहेत, उदा. “T 4955”, “T 4956” अशा स्वरूपात. हे करताना त्यांनी कोणतीही भावना, मत, किंवा भाष्य दिलेलं नाही.
दरम्यान, भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला. पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तरादाखल हवाई आणि ड्रोन हल्ले सुरू झाले आहेत. देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटींनी भारतीय लष्कराच्या शौर्याचं समर्थन करत भावनिक पोस्ट्स लिहिल्या आहेत. पण अमिताभ बच्चन यांनी या सर्वावर पूर्ण मौन बाळगल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “महानायक असूनही मौन का?”, “देशासोबत न उभं राहणं हे दु:खद आहे”, “ब्लँक पोस्टमधून काय संदेश द्यायचा आहे?”, “देश अशा वेळी आवाज उठवतोय आणि तुम्ही शांत का?”, अशा स्वरूपाच्या कमेंट्स आणि ट्वीट्स त्यांच्या पोस्टवर दिसत आहेत.
काही चाहत्यांनी मात्र यामागे काही खास कारण असावं असंही म्हटलं आहे – कदाचित ते या सर्वावर मौनातून एक संदेश देत असतील, किंवा त्यांच्या मनस्थितीमुळे त्यांनी थेट बोलणं टाळलं असेल. तरीही, त्यांच्या या मूक प्रतिक्रियेबद्दल सोशल मीडियावर चर्चेची मोठी लाट उसळली आहे.