अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, मला 2004 सालचं काही आठवत नाही. इतकी माझी मेमरी स्ट्रॉंग नाही. स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तुम्हीही पाहू शकता की, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. स्वप्नात कोण-कोणाला अडवतंय, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जी, प्रत्येकाने (Maharashtra Politics) पाहावी. स्वप्न पाहिले नाही तर जीवनचं व्यर्थ आहे. स्वप्नाव्रतच असावं. परंतु ते स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची देखील जाणीव असावी. अजितदादांनाही तसं वाटतं असेल तर काय चुकीचं आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सामाजिक परिस्थितीबद्दल न बोललेलं बरं. गावोगावी एका विशिष्ट गटाचे कार्यकर्ते धार्मिक तणाव कसा वाढेल? याच्याकडे लक्ष देत आहेत. कोणी बेकारी, कायदा-व्यवस्था, फसलेल्या योजना यावर बोलण्यासाठी तयार नाही. फक्त जातीय विद्वेष पसरवण्याचं काम सरकारचे लोक करीत आहेत. गुण्यागोविंदाने राहत असलेल्या समाजात तेढ निर्माण करून काय साध्य करायचं आहे, ते समजत नसल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
26 जणांची हत्या झाली, त्यांचे कुटुंबीय आहेत. पहलगामचा हल्ला भारताच्या सार्वभौमत्त्वावर झालेला हल्ला होता. काश्मिरी लोकांनी जो मदतीचा हात पुढे केला, त्याची वाहवा पीडितांच्या कुटुंबीयांनी केली. धर्माचं राजकारण बस करा, सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असे ते कुटुंबीय विचारत आहेत. अडीच हजार लोकांची सुरक्षा करायला एकही सैनिक नाही, हे जरा धक्कादायक अन् आश्चर्यकारक असल्याची टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
विद्वेष, द्वेष पसरवण्यासाठी सरकारकडून गावागावांत प्रयत्न सुरू झाले आहेत. मुस्लिम बांधवांना आठवडे बाजारांत रोकायचं, असे छिल्लर प्रकार सुरू आहेत. शिव-फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा अन् जातीजातींत तेढ निर्माण करायची, हे आम्हाला पटणारं नाही, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितलं आहे.