राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण महायुतीची सत्ता येऊन 100 दिवस होऊन गेले असले तरी अद्यापही सरकारकडून कर्जमाफीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पण आता याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महायुती सरकार कर्जमाफीचे आश्वासन पाळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी पोस्ट X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या या खळबळजनक विधानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत पवारांनी या मुद्द्याबाबत हात वर केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शुक्रवारी (ता. 2 मे) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांना राजू शेट्टी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याची माहिती दिली. याला उत्तर देताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेलं नाही, असे म्हणत अजित पवारांनी हात वर केले. इतकेच नाही तर अजित पवार यावेळी वारंवार “आश्वासन मी दिलेले नाही…” असेच म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता अजित पवारांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच त्यांच्याकडून कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच याबाबत आश्वासन मी दिलेले नाही, असे म्हटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा तर येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार काही पहिल्यांदाच शेतकरी कर्जमाफीबाबत नकार देताना पाहायला मिळालेले नाही. तर याआधी त्यांनी मार्च महिन्यात सुद्धा किमान तीन वर्षे तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. “सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की, 31 मार्चच्या आधी त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करावी. राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही.” असे याआधीच अजित पवारांकडून सांगण्यात आलेले आहे.