देशभरातच उष्णतेची लाट निर्माण झाली असून दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झालेत. (Weather Update) या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. (Weather) पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याने पुढील 2 तासांत 40-90 किमी/ताशी जोरदार वाऱ्यांसह दिल्ली-एनसीआर, यमुनानगर, कर्नाल, सफिदोन, पानीपत, सोहाना, पलवल, नूह, औरंगाबाद, होडल (हरियाणा), गंगोह, शामली, कांधला, नांदगाव, बरसाणा, राया, हाथरस, मथुरा, सादाबाद, आग्रा, जाजाऊ (उत्तर प्रदेश), भिवाडी, डीग, भरतपूर (राजस्थान) येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता अनेक ठिकाणी वर्तवली आहे.
हवामान विभागाने देशातील विविध राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रावरही पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. तापमान वाढीमुळे तसेच स्थानिक पातळीवरील उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शुक्रवारी (ता. 2 मे) आणि शनिवारी (ता. 3 मे) हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 3 मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. बदललेल्या वातावरणामुळे दोन दिवस पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. राज्यातील बदलणाऱ्या या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.