भारतीय जनता पक्ष, ‘एसंशिं’ (शिवसेना) वगैरे लोक ‘राज’ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) हल्ले करीत राहिले. यात राज ठाकरे यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ही राज ठाकरे यांची भूमिका होती. शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपाचे हिंदुत्व नकली आणि तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपाने राज ठाकरे यांना अडकवले आणि गाडे घसरत गेले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray’s allegations against BJP, Shiv Sena regarding Raj Thackeray)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले, अशी खोचक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते आणि ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ‘मनसे’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
राज ठाकरे एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ‘‘झाले ते झाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे या मला फार कठीण गोष्टी वाटत नाहीत. विषय फक्त इच्छेचा आहे.’’ राज ठाकरे ज्यास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेत. हे वाद कसले? ते कधीच बाहेर आले नाही. राज ठाकरे मराठी माणसांविषयी बोलत राहिले आणि शिवसेनेचा जन्मच मराठी हितासाठी झाला आणि ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. मग वाद कसले? राज ठाकरे यांच्या वतीने भाजपा, मिंधे वगैरे लोकच बोलू लागले आणि तसे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. या लोकांनी वाद सुरू केले. त्यामुळे भाजपा, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? असेही या अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.