आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी भाषेचीही सक्ती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे. हा निर्णय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, सर्वात जास्त धोका मुंबईसह महाराष्ट्राला हिंदीपेक्षा गुजरातीपासून असल्याचा दावा केला.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलतना ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे. हिंदी भाषेबद्दल वाद असण्याचे काहीच कारण नाही. त्रिसूत्री भाषेचा हा मुद्दा आहे, ज्याला पाहिजे तो ती भाषा घेईल, पण मिस्टर फडणवीस सक्ती करायची नाही, हा महाराष्ट्र आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
आम्ही हिंदीला विरोध केलेला नाही. मराठी आमची आई तर इतर भाषा आमच्या मावशा आहेत. आम्ही बोलताना हिंदी भाषेचाही वापर करतो. दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीच बोलतो, असे सांगतानाच, आमची मुले परदेशात शिकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. या मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठीच असली पाहिजे आणि याविषयी काहीच आक्षेपच नाही. पण महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका, हिंदीपेक्षा गुजरातीपासून आहे. पश्चिम मुंबईचे संपूर्ण गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यावर कोणीच का बोलत नाही? भाजपाला वाईट वाटेल म्हणून का? असा बोचरा प्रश्न त्यांनी केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत हिंदी भाषेची सक्ती करण्याला दक्षिणेकडील राज्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, दक्षिणेतील राज्यकर्ते कडवट आहेत. पण आमचे गुलाम आहेत, व्यापारी आहेत, दिल्लीचे चरणदास आहेत. ते तसा विरोध करणार नाहीत.