महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. तर मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही ठाकरे आणि मनसे युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis’ reaction on Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, जर दोन्ही नेते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कारण कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील, तर यात वाईट वाटायचे काहीच कारण नाही. पण मला वाटतं की, माध्यमं या गोष्टीचा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे थोडी वाट बघा, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या अटी-शर्तींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ऑफर देणार हे, रिसपॉण्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे आणि सांगणारे ते, या विषयावर मी का बोलावं. त्यांना विचार याबद्दल. मला का विचारत आहात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणं टाळलं. दरम्यान ठाकरे-मनसे युतीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे आम्ही त्याविषयी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका घ्यावी. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आमच्यासोबत होते, पण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी भाजपा किंवा महायुतीसोबत राहण्यास नापसंती दर्शवली. त्यावेळी त्यांनी तसा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा, हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे, असे मत बावनकुळे यांनी मांडले.