समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करणे महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून समृद्धीवरून प्रवास करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ‘समृद्धी’वरील पथकरात 19 टक्क्यांची वाढ केली आहे. नागपूर ते मुंबई मार्ग सुरू झाल्यावर ‘समृद्धी’वरून प्रवास करण्यासाठी 1,445 रूपये मोजावे लागणार आहेत. तर, नागपूर ते नाशिकमधील इगतपुरीसाठी कारचालकांना 1,290 रूपये द्यावे लागणार आहे.
नागपूर ते मुंबई 701 किलोमीटर असा ‘समृद्धी’ महामार्ग आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी 625 किलोमीटर महामार्गाचे काम झाले आहे. येत्या काही दिवसांत इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. पण, नागपूर ते मुंबई हा संपूर्ण महामार्ग सुरू होण्यापूर्वीच ‘एमएसआरडीसी’ टोलमध्ये वाढ करून नागरिकांना झटका दिला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये महामार्ग सुरू झाला होता. तेव्हा, टोलचे दर जाहीर करण्यात आले होते. कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रूपये पथकर आकारला जात होता. पण, 1 एप्रिलपासून नवे दर जाहीर झाल्याने कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 2.06 रूपये मोजावे लागणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंते हे पथदर लागू राहतील, असे ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले.
Samruddhi Mahamarg नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार?
वाहनांचा प्रकार : सध्याचे दर : नवे दर
कार, हलकी मोटार : 1,080 : 1,290
हलकी, व्यावसायिक, मिनी बस : 1,745 : 2,075
बस अथवा दोन आसांचा ट्रक : 3,655 : 4,355
तीन आसांची व्यावसायिक : 3,990 : 4,750
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री : 5,740 : 6,830
अति अवजड वाहने : 6,980 : 8,345