गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये (Vasai Fire) आग लागण्याच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे या घटना घडू नये याकरिता राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता वसईमध्ये मजुरांच्या झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. 15 मार्च) रात्री वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. या घटनेमुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या परिसरात सर्व मजुर आणि त्यांची कुटुंब वास्तव्यास आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, होळी सणानिमित्त बहुतांश मजूर आपल्या गावी गेल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत मजुरांच्या झोपडीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या झोपडपट्टीतील बहुतांश मजूर पालघर जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये राहणारे रहिवासी आहेत. या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या झोपडीधारक मजुरांना तातडीने मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता या आगीत संसार उद्ध्वस्त झालेल्या गरीबांना शासनाकडून काही मदत करण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, रात्री 8 च्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या ठिकाणी काही झोपड्यांमध्ये असलेल्या नागरिकांनी आपला जीव वाचविण्याकरिता सैरावैरा धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे. पण आता अनेकांची कुटुंब उघड्यावर पडल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.