भारतीय स्टार फुटबॉलर सुनील छेत्री (Sunil Chhetri) पुन्हा एकदा भारतासाठी खेळताना दिसणार आहे. या महिन्यात होणाऱ्या फिफा मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये तो भारतासाठी खेळताना दिसणार आहे. याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) माहिती दिली आहे. सुनील छेत्रीने काही महिन्यांपूर्वी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती मात्र आता भारतीय संघाला मदत करण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत एआयएफएफने ‘एक्स’ लिहिले की, ‘सुनील छेत्री पुन्हा भारतासाठी खेळणार आहे. तो एक महान कर्णधार आणि खेळाडू आहे. तो मार्चमध्ये होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी भारतीय संघात परतला आहे. सुनीलने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. तो भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे. भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांनी मार्च फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी 26 खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्रीचा समावेश केला आहे. सुनील छेत्रीने वयाच्या 39 व्या वर्षी 94 आंतरराष्ट्रीय गोलसह निवृत्ती जाहीर केली होती. तो क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) , लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि अली दाई (Ali Dai) यांच्यानंतर पुरुष फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानी आहे.
सुनील छेत्रीने 6 जून 2024 रोजी कोलकात्ता येथे कुवेतविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर आता 19 मार्च रोजी मालदीवविरुद्ध पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळताना दिसणार आहे. 25 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशियाई कप सौदी अरेबिया 2027 पात्रता फेरीच्या अंतिम फेरीच्या पहिल्या सामन्याची तयारीसाठी भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.
मार्केझ म्हणाले, ‘आशियाई कपसाठी पात्रता मिळवणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. स्पर्धेचे महत्त्व आणि आगामी सामने लक्षात घेता, मी सुनील छेत्रीशी राष्ट्रीय संघाला बळकटी देण्यासाठी पुनरागमन करण्याबद्दल चर्चा केली. त्याने होकार दिला आणि म्हणूनच आम्ही त्याला संघात समाविष्ट केले आहे. निवृत्तीनंतर, छेत्री इंडियन सुपर लीगमध्ये बेंगळुरू एफसीकडून खेळत आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये 12 गोल केले आहेत.
Sunil Chhetri मार्च 2025 च्या फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी भारताचा 26 जणांचा संघ:
गोलकीपर: अमरिंदर सिंग, गुरमीत सिंग, विशाल कैथ.
बचावपटू: आशिष राय, बोरिस सिंग थांगजाम, चिंगलेनसाना सिंग कोन्शम, हिंगथानमाविया, मेहताब सिंग, राहुल भेके, रोशन सिंग, संदेश झिंगन, सुभाशिष बोस.
मिडफिल्डर्स: आशिक कुरुनियन, आयुष देव छेत्री, ब्रँडन फर्नांडिस, ब्रायसन फर्नांडिस, जॅक्सन सिंग थोनाओजम, लालेंगमाविया, लिस्टन कोलासो, महेश सिंग नौरेम, सुरेश सिंग वांगजाम.
फॉरवर्ड: सुनील छेत्री, फारुख चौधरी, इरफान याडवाड, लालियांझुआला छांगटे आणि मनवीर सिंग.