राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. आताही पुण्यात या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे राज्यात एकूण 192 रुग्ण आहेत. तर 8 मृत्यू झाले आहेत. यातील सात रुग्ण पुण्यातील तर एक मयत रुग्ण सोलापुरातील आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 91 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 192 पैकी 91 रुग्ण नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील आहेत. तसेच 39 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा, 25 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील तर 8 रुग्ण अन्य जिल्ह्यांतील आहेत.
पुणे मनपा आणि जिल्ह्यातील विविध भागांत सर्वेक्षणाच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. बिबवेवाडीत राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला आहे. हा रुग्ण वाहनचालकाचे काम करत होता. काही दिवसांपासून त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्याला पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Guillain Barre Syndrome जीबीएस संसर्गजन्य नाही
दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.