ओतूर,प्रतिनिधी:दि.२ फेब्रुवारी ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा व रोहोकडी गावात वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी दि.२ रोजी बिबट्याने दोघांवर हल्ला करून,दोघांना जखमी केल्याची घटना घडली आहे.
सुनील बबन निमसे,वय ४२ वर्ष रा.पिंपळगाव जोगा, ता.जुन्नर.अभय विलास घोलप वय १९ वर्ष,रा.रोहोकडी, ता.जुन्नर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ हे अधिक माहिती देताना म्हणाले की,सुनील बबन निमसे रा.पिंपळगाव जोगा हे घराबाहेर असलेल्या शेडमध्ये झोपले असताना पहाटे पावणे पाच वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.तसेच रोहोकडी येथे अभय विलास घोलप रा.रोहोकडी हा दुचाकीवरून शेतात जात असता सकाळी साडेसहा वाजता रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून, त्यांना जखमी केले. दोन्ही जखमी व्यक्तींना वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन, पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी नेण्यात आले आहे.ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी वनविभागाचे पथक तात्काळ दाखल झाले. वनपाल मनीषा काळे,वनरक्षक रेखा धूम,वनपाल रूपावली जगताप,वनरक्षक वाजे,किसन खरोडे वनरक्षक,व्ही.ए,बेले, फुलचंद खंडागळे,रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी भेट दिली तसेच दोन्ही घटनेच्या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच रेस्क्यू टीम यांनी बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना बाबत जनजागृती करीत असल्याचे वनपरिक्षेत्र आधिकारी ठोकळ यांनी सांगीतले.
नागरिकांनी पहाटे उघड्यावर शौचालयास जाऊ नये तसेच रात्री उघड्यावर घराबाहेर झोपू नये. तसेच बिबटप्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवणे जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी त्याची जागा बदलतील असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.