कुर्लामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण राज्यभरातून या घटनेने शोक व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरामध्ये असा अपघात घडल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या अपघाताची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत केली आहे. तर, चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेदेखील सांगितले आहे.
दरम्यान, सोमवारी (9 डिसेंबर) रात्री कुर्ला येथील एलबीएस मार्गावर एका भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले. यामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 49 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले. तसेच, या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेदेखील सांगण्यात आले. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात विरोधकांची महत्वाची बैठक
देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.