चौथ्या दिवसाअखेर टीम इंडिया अजूनही इंग्लंडच्या 137 धावांनी पिछाडीवर (Ind Eng Test Cricket) असली, तरी शुभमन गिल आणि के. एल. राहुलच्या झुंजार खेळीने भारताला मोठ्या संकटातून सावरलं आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात 669 धावा ठोकत 311 धावांची भक्कम आघाडी घेतली गेली. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावाची सुरुवात भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. ख्रिस वोक्सने सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शनला पहिल्याच ओव्हरमध्ये भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवलं.
भारतातील स्थिती 2 बाद 0 अशी असताना अनेकांना वाटलं की सामना चौथ्याच दिवशी संपेल. मात्र त्यानंतर गिल-राहुल जोडीने संयमी खेळी करत धावसंख्या हळूहळू वाढवली. दोघांनीही अर्धशतक ठोकलं. राहुलने 210 चेंडूंमध्ये नाबाद 87 धावा करत किल्ला लढवला, तर गिल 78 धावांवर नाबाद आहे. भारताने दिवसअखेर 63 ओव्हरमध्ये 2 बाद 174 धावा केल्या आहेत.
यापूर्वी, इंग्लंडकडून जो रुटने 150 आणि कर्णधार स्टोक्सने दमदार 141 धावा करत भारतावर दडपण आणलं. रवींद्र जडेजाने भारतासाठी सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपला होता, ज्यात साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांचं अर्धशतक ठळक ठरलं. इंग्लंडसाठी स्टोक्सने 5 बळी घेतले.
पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला हार टाळायची असेल, तर ही जोडी अशाच लयीत टिकणं अत्यावश्यक आहे. क्रिकेटप्रेमींची नजर आता या निर्णायक दिवसावर खिळली आहे.