केंद्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण आणि आरोग्यपूरक निर्णय घेतला आहे. जसा सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा असतो, तसाच इशारा आता देशभरातील सरकारी कार्यालयांच्या कँटीनमध्ये उपलब्ध असणाऱ्या तेलकट आणि गोड पदार्थांसाठीही दिला जाणार आहे. ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढत सर्व शासकीय संस्थांना आदेश दिले आहेत की, त्यांच्या कँटीनमध्ये समोसे, वडापाव, भजी, पिझ्झा, कचोरी यांसारख्या पदार्थांसोबत ते आरोग्यासाठी किती धोकादायक आहेत, याची स्पष्ट माहिती फलकाद्वारे दिली जावी.
या फलकांवर केवळ पदार्थांचे फोटोच नव्हे, तर त्यामधील ‘फॅट’ किंवा ‘साखर’चे प्रमाण देखील नमूद असणार आहे. उदाहरणार्थ, एका वडापावमध्ये 10 ग्रॅम फॅट, एका समोशात 17 ग्रॅम फॅट, एका गुलाबजामूनमध्ये तब्बल 32 ग्रॅम साखर असल्याचे या परिपत्रकात नमूद आहे. म्हणजेच, हा फलक पाहून कुणीही विचारपूर्वक आणि मर्यादित प्रमाणात अशा पदार्थांचं सेवन करेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात तेलाच्या वापरात 10 टक्क्यांनी कपात करण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून हा पुढचा मोठा टप्पा पेलण्यात आला आहे. कार्यालयांतील कँटीनमध्ये, लॉबीमध्ये, बैठकीच्या कक्षात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी हे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याची दखल घेतील.
या निर्णयामागे एक गंभीर पार्श्वभूमी आहे भारतात लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शहरांमध्ये दर पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ असून, बालपणापासून लागलेल्या चुकीच्या आहारशैली यामागील प्रमुख कारण आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मानसिक ताण आणि काही कर्करोगांपर्यंतचा धोका वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, सध्या भारतात 7.7 कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि 2050 पर्यंत ही संख्या 44.9 कोटींपर्यंत पोहोचू शकते. याच पार्श्वभूमीवर ‘फिट इंडिया मूव्हमेंट’च्या माध्यमातून सरकार लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि आरोग्यदायी पर्याय निवडण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे.