भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक यशस्वी आणि प्रेरणादायक जोडपं समजल्या जाणाऱ्या सायना नेहवाल ( Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यपने (parupalli kashyap) आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी खुद्द सायनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केली. “आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशांमध्ये घेऊन जातं. विचारपूर्वक चर्चेनंतर आम्ही विभक्त होतो आहोत,” असे ती म्हणाली. ती पुढे म्हणाली, “शांती, आत्मविकास आणि मानसिक आरोग्य यांना प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला आहे. कश्यपला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.”
सायना आणि कश्यपची ओळख 1997 मध्ये एका बॅडमिंटन शिबिरात झाली होती. 2002 पासून त्यांनी हैदराबाद (Hyderabad) येथील पुलेला गोपीचंद अकादमीत एकत्र सराव सुरू केला आणि हळूहळू ही ओळख मैत्रीत आणि पुढे प्रेमात बदलली. 2004 मध्ये गोपीचंद अकादमी स्थापन झाल्यानंतर त्यांच्या नात्यात अधिक जवळीक निर्माण झाली. 2018 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या प्रेमकथेला देशभरातून भरभरून प्रेम मिळालं होतं.
सायना ही भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू असून, 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं होतं. पारुपल्ली कश्यपने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. दोघांचं करिअर अत्यंत प्रेरणादायक राहिलं आहे.
मात्र गेल्या काही काळात सायना खेळापासून दूर होती. 2023 मध्ये सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने अधिक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही. तसेच ‘हाऊस ऑफ ग्लोरी’ या पॉडकास्टमध्ये तिने संधीवाताच्या त्रासामुळे आपल्या कारकिर्दीवर परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. सायना 2025 अखेरीस निवृत्तीबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे तिने सांगितले होते.
सध्या या दोघांचं व्यक्तिगत आयुष्य चर्चेत असलं, तरी त्यांच्या बॅडमिंटन क्षेत्रातील योगदानास कोणताही विसर पडू नये. या दोघांनी भारतीय बॅडमिंटनला जे योगदान दिलं, त्याचं स्मरण कायम राहील. त्यांच्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी दोघांनाही शुभेच्छा!