22.7 C
New York

Divya Bharti : दिव्याच्या आईने केला दिव्याच्या मृत्यूबद्दल खुलासा?

Published:

बॉलीवूडमध्ये केवळ काही वर्षांत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) आजही प्रेक्षकांच्या स्मरणात जिवंत आहे. तिच्या अभिनयातली ताजगी, नृत्यातला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं बालसुलभ आकर्षण यामुळे ती 90 च्या दशकातली सर्वात झपाट्याने लोकप्रिय होणारी अभिनेत्री ठरली होती. पण तिचं आयुष्य जितकं तेजस्वी होतं, तितकंच अचानक आणि गूढरीत्या संपलं.

25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या दिव्या भारती हिला बालपणीपासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. शिक्षणात फारशी रस न दाखवणारी दिव्या वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. 1990 मध्ये तेलुगू चित्रपट ‘बोब्बिली राजा’ (Bobbili Raja) मधून तिनं पदार्पण केलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. दक्षिणेकडील लोकप्रियता पाहून बॉलिवूडकडून तिच्यावर ऑफर्सचा वर्षाव झाला.

1992 साली ‘विश्वात्मा’ चित्रपटातून तिनं हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘सात समंदर पार’ हे गाणं प्रचंड गाजलं आणि दिव्याला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर तिनं ‘दीवाना’, ‘शोला और शबनम’, ‘दिल का क्या कसूर’, ‘बलवान’, ‘दिल आशना है’ यांसारख्या हिट चित्रपटांत काम करत फक्त दोन वर्षांत 21 चित्रपटांत झळकण्याचा विक्रम केला.

10 मे 1992 रोजी दिव्यानं निर्माता साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांच्याशी गुपचूप लग्न केलं. या विवाहानंतर तिनं इस्लाम धर्म स्वीकारल्याचंही समजतं. पण या नव्या आयुष्याची सुरूवात होत असतानाच, केवळ 10 महिन्यांत – 5 एप्रिल 1993 रोजी तिचा मृत्यू झाला. ती तिच्या वर्सोवा येथील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली. हा अपघात होता की आत्महत्या, की त्यामागे काही दुसरं गूढ होतं? – या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालेलं नाही.

सध्या सोशल मीडियावर दिव्याच्या आई मीता भारती यांची एक थ्रोबॅक मुलाखत व्हायरल होत आहे. ‘ig_divyabharti’ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत त्या सांगतात, “दिव्याच्या जन्मकुंडलीत बालमृत्यूचा स्पष्ट संकेत होता. आठव्या वर्षी काहीतरी होईल, असं सांगितलं होतं. पण ती मोठी झाली आणि मी ते विसरले. मात्र जेव्हा तिचा मृत्यू झाला, तेव्हा तो पूर्वानुमान आठवलं.”

दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक अफवा पसरल्या. काहींनी आत्महत्येचं कारण व्यावसायिक ताणतणाव, व्यसने आणि वैवाहिक कलह सांगितले. तर काहींनी खूनाचा संशय व्यक्त केला. काही प्रत्यक्षदर्शी आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी दिव्या काहीशी अस्वस्थ होती. पण अजूनही तिचा मृत्यू अपघात मानावा की आत्महत्या यावर कोणताही ठोस निष्कर्ष लागलेला नाही.

दिव्या भारतीचं आयुष्य जसं लहान होतं, तसंच ते विलक्षण होतं. अवघ्या 19 व्या वर्षी तिनं जे काही साध्य केलं, ते आज अनेकांना प्रेरणा देतं. ती एक अशी अभिनेत्री होती जिने आपलं नाव इतिहासात कोरलं, आणि तिचा मृत्यू एक असा अध्याय आहे जो अजूनही उलगडायचा बाकी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img