27 C
New York

ENG vs IND : ड्यूक्स बॉलवर ऋषभ पंतने उपस्थित केला प्रश्नचिन्ह?

Published:

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ऐतिहासिक एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सिरीजमध्ये, टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतने (Rishabh pant) एका अत्यंत गंभीर आणि चर्चात्मक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ड्यूक्स चेंडूच्या गुणवत्तेवर त्याने थेट प्रश्न उपस्थित करत चेंडू लवकर खराब होतो, नरम पडतो आणि त्याचा आकारही बिघडतो, असा स्पष्ट आरोप ऋषभने केला. त्याच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात नवीनच वाद निर्माण झाला आहे.

“माझ्या अनुभवात मी कधीही चेंडू इतक्या लवकर खराब होताना पाहिलेला नाही. या सिरीजमध्ये चेंडू नरम होतोय, आकार बिघडतोय, ज्यामुळे गोलंदाजांनाही स्विंग मिळत नाही आणि फलंदाजांनाही खेळणं अवघड होतं.” त्याने असंही सांगितलं की, पहिल्या कसोटीत भारतीय संघाने अंपायरकडे अनेक वेळा चेंडू बदलण्याची मागणी केली होती ही बाब गंभीर विचारात घेण्यासारखी आहे.

ऋषभ पंतच नव्हे, तर शुबमन गिलने (Shubman Gill) सुद्धा एजबस्टन कसोटीनंतर ड्यूक्स बॉलच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली होती. गिलच्या म्हणण्यानुसार, “चेंडू छोटा आणि टणक असायला हवा, पण हा चेंडू लवकर मूवमेंट थांबवतो आणि खेळाडूंना सतत अडचणीत टाकतो.”

या चर्चावर ड्यूक्स बॉल बनवणाऱ्या ब्रिटिश अल्बियन कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया (Dilip Jajodia) यांनी खुलासा केला ते म्हणाले, “आजच्या काळात बॅट्स खूप मजबूत बनल्या आहेत. खेळाडूही पूर्वीपेक्षा अधिक ताकदवान आहेत. जर आम्ही चेंडू जास्त हार्ड बनवला, तर बॅट्स तुटू शकतात. त्यामुळे बॅलन्स साधणं गरजेचं आहे.”

इंग्लंडमध्ये हवामान सतत बदलतं, ज्याचा परिणाम चेंडूवर होतो. मैदानावरील आर्द्रता, माती, खेळपट्टीची झीज हे सुद्धा चेंडूच्या अवस्था बिघडण्यामागे कारणीभूत ठरू शकतात. जुन्या ड्यूक्स बॉलच्या तुलनेत सध्या वापरले जाणारे चेंडू हलके आणि कमी टिकाऊ असल्याचंही काही माजी खेळाडूंचं निरीक्षण आहे.

BCCI किंवा ICC या मुद्द्यावर कोणती पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर खेळाडूंनी एकमुखाने चेंडूच्या गुणवत्तेवर आवाज उठवायला सुरुवात केली, तर भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलमध्ये काही बदल घडू शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img