बॉलीवूड म्हणजे ग्लॅमर, चमकधमक, रेड कार्पेट, सेलिब्रिटींची थाटामाटातली एन्ट्री, आणि चाहत्यांचं प्रचंड प्रेम. पण या भपकेदार दुनियेच्या आड एक भयानक वास्तव दडलेलं आहे असं वास्तव ज्यावर फारसं बोललं जात नाही. वेळोवेळी काही कलाकारांनी हे अधोरेखित केलं आहे. आता ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनीही अशीच एक कटू आठवण शेअर केली आहे, जी सिनेसृष्टीतील भावनात्मक शून्यता आणि बनावट दुःख याकडे स्पष्ट इशारा करते.
एका मुलाखतीत आशिष विद्यार्थी यांनी 90च्या दशकातील एक प्रसंग सांगितला. प्रसिद्ध दिग्दर्शक मुकुल आनंद (Mukul S. Anand) यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत ते उपस्थित होते. मुकुल आनंद ‘दास’ या चित्रपटावर काम करत होते, ज्यात सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) प्रमुख भूमिकांमध्ये होते. आशिष विद्यार्थी त्या चित्रपटासाठी अमेरिकेत शूटींग करत होते आणि परतल्यावर त्यांना मुकुल आनंद यांच्या निधनाची बातमी मिळाली.
आशिष विद्यार्थी म्हणाले, “प्रार्थना सभेला मी पहिल्यांदाच जात होतो. सर्वजण पांढरे कपडे आणि काळे गॉगल घालून आले होते. मी अनभिज्ञ असल्याने रंगीत कपड्यांत होतो. तसं पाहता हेच मला अधिक मानवी वाटत होतं. लोक तिथं केवळ रितसर दुःख व्यक्त करत होते.”
पण खरी धक्का देणारी गोष्ट पुढे घडली. प्रार्थना सभेच्या शेवटी एक निर्माते त्यांच्या बाजूला आले आणि म्हणाले, “दुःखद घटना आहे ही, पण पुढच्या शूटींग डेट्सबद्दल आपण बोलू या.” यावर आशिष विद्यार्थी अवाक झाले. त्यांचं म्हणणं होतं, “मी त्यांचं ऐकूनही शांत राहिलो, पण मनात मात्र प्रचंड वादळ उठलं.”
ते पुढे म्हणाले की, “या इंडस्ट्रीत प्रत्येकजण एकमेकांशी व्यावसायिक नात्यांपुरता जोडलेला असतो. त्यामुळे कुणाचा मृत्यू झाला की दुःखही व्यावसायिक पातळीवरच व्यक्त केलं जातं. वैयक्तिक हळवेपणाला फारसं स्थानच नाही.”
त्यांनी असंही नमूद केलं की, काही कलाकार अंत्यसंस्कारात एकीकडे फोनवर ‘सांत्वना’ व्यक्त करतात आणि दुसरीकडे कुजबुजत नवीन प्रोजेक्ट्सची चर्चा करतात.
सोशल मीडियावर श्रद्धांजली देण्याच्या ट्रेंडवरही त्यांनी टीका केली. “आजकाल एखाद्याच्या निधनावर ‘ओम शांती’ किंवा ‘लवकर निघून गेला’ अशी पोस्ट करून लोक आपली संवेदना दाखवतात, पण ती खरी असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बॉलीवूडच्या या कथित “प्रोफेशनल दुःख” कल्चरवर विचार केला, तर लक्षात येतं की इंडस्ट्रीत वेळ, तारखा, प्रोजेक्ट्स, कॉन्ट्रॅक्ट्स इतकंच महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे एखाद्याच्या जाण्याचं दुःखही केवळ इव्हेंटसारखं साजरं केलं जातं. हे म्हणजे भावना आणि व्यवहार यांचं विचित्र मिश्रण!
आशिष विद्यार्थींच्या या आठवणीने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की, ग्लॅमरच्या दुनियेत माणुसकी आणि संवेदना कुठे हरवून बसल्या आहेत, हे शोधणं गरजेचं आहे. वास्तविक भावना आणि दिखाऊ श्रद्धांजली यामधला फरक समजून घेणं आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठीही महत्त्वाचं आहे.