IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. गाजियाबादमधील इंदिरापूरम भागात राहणाऱ्या एका युवतीने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी गाजियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामुळे यश दयालचं करिअर आणि व्यक्तिगत आयुष्य धोक्यात आलं आहे.
पाच वर्षांचं नातं आणि फसवणुकीचे आरोप
तक्रारदार युवतीने पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात यशने तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, मात्र वेळ जात असतानाही तो वेळकाढूपणा करत राहिला.
पीडितेचा आरोप आहे की, यशने त्या विश्वासाचं गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिचं मानसिक, आर्थिक शोषण केलं. तिने याविरोधात चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ कॉल्सचे पुरावे पोलिसांना दिले आहेत.
हेल्पलाइनकडेही दुर्लक्ष, अखेर तक्रार नोंदवली
पीडितेने 14 जून रोजी महिला हेल्पलाइन 181 वर संपर्क साधला, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे 21 जूनला तिने थेट CM हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
दयालकडून नकार, वडिलांचं स्पष्टीकरण
यश दयालच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या आरोपांवर नाराजी व्यक्त केली. “ही युवती कोण आहे, आम्हाला माहिती नाही. आमच्या मुलावर हे आरोप का केले जात आहेत, तेच समजत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. यशकडून मात्र यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
खेळाडू म्हणून यशस्वी, पण वैयक्तिक आयुष्यात वादग्रस्त
IPL 2025 मध्ये यश दयालने RCBकडून 15 सामने खेळून 13 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीमुळे RCBने पहिल्यांदाच IPL चषक जिंकला होता. युपीच्या रणजी संघातून खेळणाऱ्या यशचा प्रोफेशनल ग्राफ चढता असताना, आता हे आरोप त्याचं संपूर्ण भविष्य अंधारात टाकू शकतात.
हा प्रकार केवळ यश दयालसारख्या खेळाडूच्या प्रतिमेसाठीच नव्हे, तर क्रिकेट क्षेत्रात वावरत असलेल्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक नात्यांतही जबाबदारीने वागणं किती महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करतो. पोलिस तपासानंतर सत्य काय आहे, ते समोर येईल. तोपर्यंत समाजाने संयम बाळगणं आवश्यक आहे.