सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाला ठणकावून धडा शिकवताना दिसतेय. या व्हिडीओने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवली असून, राजश्रीचे धाडस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्याशी संबंधित आहे. व्हिडीओमध्ये राहिल शेख नशेत चूर, अर्धनग्न अवस्थेत, राजश्रीला अश्लील आणि अपमानास्पद शब्दांत बोलताना स्पष्ट दिसतो. मात्र यावेळी राजश्रीने घाबरून मागे हटण्याऐवजी, त्याच्या वर्तनाचा ठोस प्रतिकार करत संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि नंतर ती सोशल मीडियावर शेअर केली. या व्हिडीओनंतर अनेकांचे लक्ष राजश्री मोरेवर गेले आहे. “ही धाडसी महिला आहे तरी कोण?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
राजश्री मोरे – एक संघर्षातून उभी राहिलेली यशस्वी उद्योजिका आणि मॉडेल
राजश्री मोरे मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा गावची असून ती एक बिझनेस वुमन, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. शालेय शिक्षण मराठी शाळेत झाले, पण काही कौटुंबिक अडचणीमुळे हायस्कूल पूर्ण करू शकली नाही. वडिलांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता, पण राजश्री अवघी १६ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. तिच्या कुटुंबात सध्या आई, एक भाऊ आणि एक बहीण आहेत.
राजश्रीने सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड दिलं, पण ती तग धरून उभी राहिली. तिचा स्वतःचा नेल आर्ट स्टुडिओ आणि मालाड (मुंबई) येथील ब्युटी पार्लर आहे. या व्यवसायाच्या कल्पना तिला ‘लक्ष्मी’ नावाच्या एका अनुभवी ब्युटीशियनकडून मिळाली होती. आज तिच्या या व्यवसायाच्या अजून दोन शाखा मुंबईत यशस्वीपणे चालू आहेत.
ग्लॅमर विश्वात आणि सोशल मीडियावर सक्रीय
राजश्री फक्त व्यवसायातच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीत आणि मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे. तिची ओळख बॉलिवूड आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्तींशी आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील वादग्रस्त आणि लोकप्रिय चेहरा राखी सावंत ही राजश्रीची जवळची मैत्रीण आहे. दोघींची मैत्री नेल आर्ट स्टुडिओमध्ये झालेल्या पहिल्या भेटीपासून सुरू झाली आणि त्यानंतर त्या अनेकदा एकत्र कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत.
राजश्रीची सोशल मीडियावरही तगडी उपस्थिती आहे. तिच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुमारे ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच ट्रेंडिंग फोटोशूट, व्हिडीओज आणि समाजप्रश्नांवरील पोस्टमुळे चर्चेत असते.
राजश्री मोरे ही एक सामान्य कुटुंबातून आलेली, पण अपार मेहनत, चिकाटी आणि धाडसाने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी महिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ तिच्या ठाम आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या वृत्तीचं जिवंत उदाहरण आहे. आज ती केवळ एक इन्फ्लुएन्सरच नव्हे, तर अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.