बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार विविध धर्म, जाती आणि देशांतून आलेले असले तरी, काही कलाकार स्वतःच्या धार्मिक मर्यादांपलीकडे जाऊन अध्यात्माचा स्वीकार करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी.
नर्गिस मूळची मुस्लिम कुटुंबातून येते. तिचे वडील मोहम्मद फाखरी हे पाकिस्तानमधले असून आई मेरी फाखरी अमेरिकन आहे. नर्गिसचा जन्मही अमेरिकेतच झाला असून ती स्वतःला ‘ग्लोबल सिटिझन’ मानते. वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. यानंतर ती आईसोबत अमेरिकेतच वाढली.
नर्गिसने बॉलिवूडमध्ये रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. पण अभिनयाच्या पलीकडे एक वेगळी बाजू तिच्या व्यक्तिमत्त्वाची आहे – ती म्हणजे तिचं अध्यात्माकडे असलेलं आकर्षण.
नर्गिसने एका मुलाखतीत सांगितलं की, ती धार्मिक नसली तरीही ती स्वतःला spiritual मानते. तिला सर्व धर्मांविषयी जाणून घ्यायला आवडतं. तिच्या घरात गायत्री मंत्राचं पठण केलं जातं आणि ती स्वतःही हनुमान चालिसा मोठ्या श्रद्धेने म्हणते. ती म्हणते, या मंत्रोच्चारांमधून मिळणारी एनर्जी ती अनुभवते, आणि यामुळे तिचं मन शांत राहतं.
नर्गिस फक्त पठणच करत नाही, तर ती दरवर्षी दोनदा 9 दिवसांचे उपवास सुद्धा करते आणि हे उपवास खूप कठीण असतात, कारण या काळात ती फक्त पाणी पिते आणि काहीही खात नाही. हेच तिच्या सौंदर्याचं रहस्य असल्याचं ती सांगते.
ती फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली की, “जेव्हा माझ्यावर ताण असतो, तेव्हा मी गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसा म्हणते. त्यातून मला मानसिक शांती मिळते.” इतकंच नव्हे, तर ती ख्रिश्चन म्युझिकही आवडीने ऐकते. ती स्पष्ट सांगते की, या गोष्टी तिनं धर्म बदलल्यामुळे नाही केल्या, तर एक अंतर्मुख आध्यात्मिक शोध म्हणून केल्या.
नर्गिस फाखरी ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर धार्मिक सीमांच्या पलीकडे जाऊन अध्यात्माचा स्वीकार करणारी जागतिक नागरिक आहे. मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊनही तिने हिंदू परंपरा, मंत्रोच्चार आणि उपवासांमध्ये रुची दाखवली आहे.